हिंगोली- संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता जिल्ह्यासह खेड्या पाड्यातही वाढत असल्याचे समोर आले आले. अशा वेळेस हिंगोली शहरातील नागरिकांकडून सामाजिक भान ठेवून सामाजिक अंतर पाळणे व गर्दी न करणे अपेक्षित आहे. मात्र, शहरातील नागरिक प्रशासकीय नियमांना बगल देताना दिसून येत आहे. त्यामुळे, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
आजघडीला जिल्ह्यात 410 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 310 रुग्ण बरे झाले असून 100 रुग्ण हे विविध कोविड रुग्णालय, तसेच कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मात्र, अशी भयानक परिस्थिती असूनही आज शहरात गर्दी दिसून आली.
वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. त्यामुळे ज्या भागात कोरोना रुग्ण निघालेत, तो भाग प्रशासनाच्या वतीने सील केला जात आहे. एवढेच नव्हे तर, सील केलेल्या भागात नागरिक फेरफटका मारत असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या भागात कडक बंदोबस्त तैनात करून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी समिती देखील गठीत केली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्यामुळे त्या- त्या शासकीय कार्यालयाची दारे आता बंद केलेली आहेत. तरीदेखील जिल्ह्यातील अनेकांना याचे अजिबात भान राहिले नसल्याचेच आज शहरातील भयंकर गर्दीतून दिसून आले.
हिंगोली शहरातील नेहमीसारखेच रस्ते आज गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळाले. पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासनातील कर्मचारी अहोरात्र आपल्या जिवाची बाजी लावून कोरोनाला अटकाव कारणासाठी प्रयत्न करत आहेत. एवढेच नव्हे तर, पोलीस कर्मचारी रखरखत्या उन्हात कर्तव्यावर असून नागरिकांना जागृत करत आहेत. मात्र नागरिकांना या सर्व बाबींची कदरच नसाल्याचे गर्दीतून दिसून आले.