जळगाव - रब्बीचा हंगाम सुरु होत असल्याने या काळात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा याकरीता मंजूर करण्यात आलेली कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करुन वेळेवर व पुरेशी वीज उपलब्ध करुन द्या. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेत.
शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील उर्जा विभागाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील नागरीकांना व शेतकऱ्यांना वीजेचा सुरळीत पुरवठा व्हावा, याकरीता जिल्हा वार्षिक योजनेतून 2019-20 या आर्थिक वर्षात 16 कोटी 73 लक्ष निधी देण्यास प्रशासाने मान्यता दिली असून 14 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यात 194 कामे सुरु करण्यात आली आहे. तर अनेक कामे पूर्ण झाली आहे. तसेच प्रलंबित असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
विशेषत: जळगाव विमानतळ येथील विद्युत वाहिनी स्थलांतरीत करणे, आणि समांरभ रस्ते तयार करण्यासाठी ट्रान्यफार्मर स्थलांतरीत करणे, नवीन वीजवाहिन्या व केबल टाकण्याच्या कामासाठी 7 कोटी रुपयांची तरतूर करण्यात आली आहे. ही कामे तातडीने पूर्ण करावी. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक असलेले वीज कनेक्शन, तसेच शेतीला पाणी देण्यासाठी लागणारे ट्रान्सफॉर्मर वेळेत देण्याची कामे तातडीने हाती घेण्याच्याही सूचना दिल्यात.
दरम्यान, 12 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांच्यावेळी लोडशेंडीग होणार नाही याबाबात दक्ष राहण्याच्याही सुचना त्यांनी दिल्यात. त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे ऑईल खरेदी करण्यासाठी खर्चासाठी सर्व आमदारांच्या निधीतून 1 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे सांगून स्वतःच्या निधीतून 20 लाख रूपये देत असल्याचे पालकमंत्री यांनी बैठकीत सांगितले. तर मागील वर्षी याच कामासाठी 75 लाख रुपयांचा निधी नाविन्यपूर्ण योजनेतून उपलब्ध करून दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
जळगाव विद्युत मंडळ कार्यालयाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव नव्याने सादर करावा, वीजेचा धक्का लागून मृत्यु झालेल्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना मदत देण्यात यावी, तसेच उपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपचाराच्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळावी इत्यादी बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
त्याचबरोबर जळगाव तालुक्यातील चिंचोली, मोहाडी, नशिराबाद, सुनसगाव, जामनेर तालुक्यातील देऊळगाव, वाकोद, पाळधी, तोंडापूर, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, नायगाव व दुई, पाचारो तालुक्यातील सावखेडा, पारोळा तालुक्यातील बहादरपूरम, यावल तालुक्यातील साखळी, डांभूर्णी येथील उपकेंद्रांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात येऊन नव्याने 16 कामांचा नवीन डीएसआरप्रमाणे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व संबंधितांना दिल्यात.
यावेळी संबंधित आमदारांनी त्यांच्या मतदार संघातील वीज वितरणाशी संबंधित नवीन कामांचे प्रस्ताव, प्रलंबित कामे बैठकीत मांडली.या बाबतीतही तातडीने कार्यवाही करुन लोकप्रतिनिधींना अहवाल सादर करण्याच्या सुचनाही बैठकीत देण्यात आल्यात. यावेळी जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक व इतर 6 लाख 76 हजार 931 ग्राहकांकडे 3 हजार 594 कोटी 59 लक्ष 60 हजार रुपयांची थकबाकी असल्याचे सांगत, कृषीसाठी 1 लाख 99 हजार 751 शेतकऱ्यांकडील 3 हजार 63 कोटी 72 लक्ष रुपयांच्या थकबाकीचा समावेश असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.