मुंबई - राज्यात कोरोनाने अक्षरक्ष: कहर केला आहे. राज्यातील कोरोनाच्या रूग्णांचा टप्पा 1 लाखांच्या वर पोहोचला आहे. राज्याची स्थिती अत्यंत धोकादायक असताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मात्र राज्यातील शाळांची सुरूवात ही जुलै महिन्यातच करण्याचा केलेला अट्टहास पूर्ण होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शिक्षण विभागाने जुलैमध्येच शाळा सुरू करण्यासाठीचा शासन निर्णय जारी केला आहे. तर दुसरीकडे आजपासून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाने काढलेल्या या शासन निर्णयामुळे राज्यातील शाळांना विद्यार्थ्यांची व्यवस्था करताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यातच शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावर विविध प्रकारची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्यक्षात शाळा सुरू करताना शाळा दोन शिफ्टमध्ये तीन तासांची भरवली जाणार असून त्यासाठीचे वेळापत्रक ठरविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीला सांगण्यात आले आहे. एका वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी आणि एका वर्गात जास्तीत जास्त ३० विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत किमान एक मीटरचे अंतर ठेवावे, असे नमूद करण्यात आले आहे.
जे विद्यार्थी शाळांमध्ये ऑटो रिक्षा किंवा स्कूल बसने येतात, त्यांनी गर्दी करण्याऐवजी मुलांनी पायी किवा सायकलने अथवा पालकांनी आपल्या स्कूटर, सायकलने सोडण्याचे पर्याय निवडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास ऑनलाईनचा पर्याय -
राज्यात शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास शाळाच बंद करावी लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन करण्याची जबाबदारीही शाळा व्यवस्थापनावर देण्यात आली आहे. जे स्थलांतरित मजूर गावी गेले आहेत, त्यांच्या मुलांना गावी शाळेत पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये, असेही या शासन निर्णयात म्हटले आहे.
मनरेगाच्या पैशातून शाळांची स्वच्छता -
शाळांमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना साबण, पाणी, मास्क, सॅनिटायझ्रर या वस्तू पंधराव्या वित्त आयोगातील प्राप्त निधीतून पुरवाव्यात. तसेच मनरेगाच्या अंतर्गत असलेला निधी हा शाळांच्या स्वच्छतेकरिता वापरावा. ग्रामपंचायतीने मुलांचे थर्मल स्क्रिनिंग आणि वैद्यकीय तपासणी करून त्यासाठीचा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
असे असेल शाळा सुरू करण्याचे नियोजन -
जुलै महिन्यापासून नववी, दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू होतील. ऑगस्टपासून सहावी, सातवी आणि आठवीच्या शाळा सुरू होतील. सप्टेंबर महिन्यात तिसरी, चौथी आणि पाचवीच्या शाळा सुरू होतील. तर पहिली आणि दुसरीचे वर्ग व शाळा सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीवर निर्णय घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच टी.व्ही., रेडिओवर उपलब्ध होणारे शैक्षणिक कार्यक्रम दाखविण्यासाठी, ऐकवण्यासाठी पालकांना प्रवृत्त करावे, असे सांगण्यात आले आहे. तर अकरावीच्या प्रत्यक्ष वर्गांचा निर्णया हा दहावीच्या निकालानंतर घेतला जाणार आहे.