नवी दिल्ली / हैदराबाद- कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीने जगभरात थैमान घातले आहे. याने जगभरात 78 लाख 55 हजार 400 हून अधिक लोकांना संक्रमित झाले आहेत. तर, 4 लाख 31 हजार 728 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तसेच, आतापर्यंत 40 लाख 19 हजार 469 हून अधिक लोक यातून बरेही झाले आहेत.
ब्रिटन
ब्रिटनमध्ये शुक्रवारी दुपारपर्यंत आणखी 181 कोविड -19 रूग्णांचा मृत्यू झाला. यासह येथील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 41 हजार 662 वर पोहोचली, अशी माहिती ब्रिटिश आरोग्य व सामाजिक खबरदारी विभागाने शनिवारी दिली. या आकडेवारीत सर्व रुग्णालये, केअर होम्स आणि इतर मोठ्या प्रमाणातील कम्युनिटी सेटिंग्जमध्ये झालेल्या मृत्यूंचा समावेश आहे.
दक्षिण कोरिया
दक्षिण कोरियाने आणखी 34 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील बहुतेक मुख्यत: दाट लोकवस्ती असलेल्या सेऊलमध्ये सापडले आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा चढता आलेख कायम राहिला आहे.
‘या 34 नवीन रुग्णांपैकी 30 रुग्ण ग्रेटर सेऊल भागात आहेत. या भागात देशातील 51 दशलक्ष लोक म्हणजे देशाच्या लोकसंख्येपैकी जवळपास निम्मे लोक राहतात,’ असे कोरियातील रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्रांनी रविवारी सांगितले.
दक्षिण कोरियामध्ये आतापर्यंत 12 हजार 85 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 10 हजार 718 लोक बरे झाले आहेत. 1 हजार 90 लोकांवर उपचार सुरू आहेत. तर, 277 जण मरण पावले आहेत.
बहुतेक लोकांमध्ये, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ताप, खोकला यासारखी सौम्य किंवा मध्यम प्रमाणात लक्षणे जाणवतात. उपचारांनंतर दोन ते तीन आठवड्यांत ती बरीही होतात. काही जणांमध्ये, विशेषत: वृद्ध, प्रौढ आणि आधीपासून गंभीर आजार, आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी यामुळे न्युमोनिया आणि मृत्यूही होऊ शकतो.