गाझियाबाद - वय वर्षे 72 तरीही गेल्या 20 वर्षांपासून ते न थकता चालत आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका वयोवृद्ध व्यक्तीबद्दल सांगणार, जे गेली 20 वर्षांपासून पायी चालत भारत देशाची भ्रमंती करत आहेत. नरेश अग्रवाल असे या वृध्द व्यक्तीचे नाव असून ते उत्तराखंडच्या रुद्रपूरचे रहिवासी आहेत.
नरेशजी जेव्हा 52 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी घरून एक सायकल घेतली आणि पायी चालत देशाची भ्रमंती सुरू केली. ते पायी चालत देशाच्या सर्व भागात फिरले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याच प्रवासादरम्यान त्यांच्या पत्नीला देवाज्ञा झाली. परंतू ते माघारी फिरले नाही. देश हितासाठी जागरूकता मोहिम असल्याचे त्यांचे उद्दीष्ट आहे. ते म्हणतात की, देशातील भ्रष्टाचार आणि दहशतवाद संपला पाहिजे. तसेच भ्रूणहत्या थांबवायला पाहिजेत. हाच संदेश देत ते गेल्या 20 वर्षांपासून चालत आहेत.
2000 सालापासून त्यांनी ही आपली पायी यात्रा सुरू केली. देशाच्या सर्व भागात पायी प्रवास करून ते मुंबईला पोचले आणि तेथून परतून गाझियाबादला पोचले. ते म्हणतात की, आत्ता रुद्रपुर गाठायला कित्येक महिने लागतील. नरेशजी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देतात आणि संदेश देण्यासाठी पुढच्या प्रवासाला निघतात. त्यांनी त्यांना लागणाऱ्या आवश्यक बाबी सायकलवर ठेवल्या आहेत.