मुंबई - राज्यात साडे सहालाख शेतकऱ्यांच्या बांधावर खते आणि बियाणे पोहोतवल्याचा दावा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केला आहे. कोरोनाच्या काळात खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे देणआर असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले होते. कृषि विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत 1 लाख 97 हजार मेट्रीक टन खते तर 1 लाख 18 हजार क्विंटल बियाणे आणि 3 लाख 53 हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. सुमारे 6 लाख 63 हजार शेतकऱ्यांपर्यंत कृषी निविष्ठांचा पुरवठा झाला असून त्यासाठी राज्यभरात 56 हजार 216 शेतकरी गट कार्यरत असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे खरिप हंगामाचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी कृषीमंत्री, सचिव, आयुक्त यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सातत्याने बैठका घेतल्या. यातून त्यांनी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खरीपाकरता कृषी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी गटांमार्फत बांधावरच खते, बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.
शुक्रवार (12 जून) पर्यंत राज्यभरात पुरविण्यात आलेल्या कृषीनिविष्ठा बांधावर पुरविण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाणे विभागात 6662 गटांच्या माध्यमातून 86 हजार 748 शेतकऱ्यांना 4996 मेट्रीक टन खते आणि 10 हजार 230 क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. कोल्हापूर विभागात 2766 गटांनी 45 हजार 111 शेतकऱ्यांना 14 हजार 740 मेट्रीक टन खत आणि 4957 क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. नाशिक विभागात 8035 गटांच्या माध्यमातून 1 लाख 46 हजार 252 शेतकऱ्यांना 36 हजार 575 मेट्रीक टन खते आणि 14 हजार 511 क्विंटल बियाणे पुरविले आहे.
पुणे विभागात 18 हजार 181 गटांनी 1 लाख 17 हजार 635 शेतकऱ्यांना 19 हजार 181 मेट्रीक टन खते तर 6914 क्विंटल बियाणे पुरविले आहे. औरंगाबाद विभागात 3716 गटांनी 63 हजार 963 शेतकऱ्यांना 42 हजार 559 मेट्रीक टन खत आणि 7419 क्विंटल बियाणे पुरविले आहे. लातूर विभागात 7949 गटांनी 84 हजार 776 शेतकऱ्यांना 38 हजार 501 मेट्रीक टन खते, 15 हजार 228 क्विंटल बियाणे पुरविले आहे. अमरावती विभागात 6221 गटांनी 89 हजार शेतकऱ्यांना 31 हजार 474 मेट्रीक टन खते तर 45 हजार 585 क्विंटल बियाणे पुरविले असून नागपूर विभागात 2686 गटांनी 30 हजार 669 शेतकऱ्यांना 8431 मेट्रीक टन खते आणि 12 हजार 592 क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे.
राज्यात अमरावती विभागात सर्वाधिक 43 हजार 655 कापूस बियाणे पाकीटांचा पुरवठा झाला आहे. विभागामार्फत बांधावर खते, बियाणे पुरवठा करण्याची मोहिम सुरू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.