नांदेड - ट्रकने दुचाकीला मागून धडक देवून झालेल्या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील बसस्थानकाजवळ रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे.
जिल्ह्यातील बाचोटी (ता.कंधार) येथून लग्न समारंभावरून परतत असताना दुचाकीस्वार घुंगराळ्यात येताच भंगार घेऊन नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील बाप लेकीचा जागीच मृत्यृ झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. जखमी पत्नीला उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आहे.
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील बालाजी सिताराम सुगावे (वय 40) हे नातेवाईकांच्या लग्नासाठी पत्नी संगीता बालाजी सुगावे (वय 35) आणि ऋतुजा बालाजी सुगावे (वय 13) हे तिघेही मोटारसायकल (एम.एच.26 ए.ए. 684) वर बाचोटी येथील लग्न आटोपून घुंगराळा बस्थानकावर येताच नायगाव येथून भंगार घेऊन भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने (एम.एच.26 एच.8724) दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात बालाजी सुगावे व त्यांची 13 वर्षाची मुलगी ऋतुजा या बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, भंगार घेऊन जाणारा ट्रक हा भरधाव वेगाने जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. पन्नास किलोमीटरचा प्रवास करून आले काही झाले नाही, पण घरी पोहोचणार तोच काळाने सुगावे कुंटूबावर घाला घातला. बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही मृतदेह कुंटुर पोलिसांनी उत्तरीय तपसणीसाठी नायगांव ग्रामीण रूग्णालयात पाठवले आहेत. यातील गंभीर जखमी संगीता सुगावे यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. ट्रक चालकाला कुंटूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल झाला आहे.