नाशिक - खरीप हंगाम सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे, तरीदेखील जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध विकास सेवा संस्था सोसायटी संघटनांच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन केदा आहेर यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या संकटामुळे आर्थिकदृष्ट्या हतबल झालेला शेतकरी पीक कर्ज उपलब्ध होत नसल्यामुळे अडचणीत सापडला आहे. वारंवार कर्जाची मागणी करूनही बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यामुळे काल जिल्ह्यातील विविध विकास सेवा संस्था सोसायटी संघटनांच्यावतीने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन केदा आहेर यांना निवेदन देण्यात आले. तसेच आर्थिक अडचण असतानाही संपूर्ण कर्जाची फेड करत असलेल्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, बँकांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिता कर्ज उपलब्ध करून न दिल्यास नाईलाजास्तव आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातील बँकांनी लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करून देत त्यांना या संकटकाळात दिलासा देण्याची गरज आहे. यामुळे आता संघटनांच्यावतीने करण्यात आलेल्या या मागणीची दखल घेऊन शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होणार की, संघटनांना आक्रमक पावित्रा हाती घ्यावे लागणार, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.