परभणी- आठवड्याभरापसून दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत, असे सलग 3 दिवस संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीची घोषणा केली आहे.
संचारबंदीच्या अनुषंगाने परभणीत महानगरपालिका क्षेत्र आणि 5 किलोमीटर परिसरात, तर तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका क्षेत्र आणि 3 किलोमीटरच्या परिसरात संचारबंदी लागू असणार आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मूगळीकर यांनी आज दुपारी अडीच वाजता संचारबंदीचे आदेश काढले आहेत. मागच्या आठवड्यात परभणी जिल्ह्यात केवळ 4 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण होते. मात्र, त्यानंतर परभणी तालुक्यातील झरी आणि शहरातील रामकृष्ण नगर, गव्हाणे चौक, तसेच पाथरी आदी परिसरात आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत गेली. शिवाय या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या इतर नागरिकांना देखील कोरोनाची बाधा होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सद्यपरिस्थितीत संपूर्ण जिल्ह्यात 122 कोरोनाबाधित असून त्यातील तब्बल 27 रुग्ण सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यात दिलेल्या आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवेशिवाय इतर कोणीही रस्त्यावर फिरू नये, तसे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विविध शासकीय कार्यालय, सेवाभावी संस्था आणि आरोग्य संदर्भातील सेवांना मात्र या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.
ज्यामध्ये सर्व शासकीय कार्यालय व त्यांची वाहने, शासकीय व खासगी रुग्णालये, वैद्यकीय दुकान, वैद्यकीय कर्मचारी व आपातकालीन सेवा, शासकीय निवारागृह व अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेली वाहने व व्यक्ती, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांचे संपादक, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोलपंप व गॅस वितरक, कर्मचारी व वाहने, खत, कृषी, बि-बियाणे वाहतूक व गोदामे, दुकाने, कामगार, कापूस खरेदी केंद्र, राष्ट्रीय बँका केवळ रास्तभाव दुकानदारांकडून चलनाद्वारे रोकड भरणा, तसेच ग्रामीण भागातील बँकेसाठी रोकड घेवून जाणारी वाहने व दूध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9 या वेळात संचारबंदीच्या काळात मुभा देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.