मुंबई - क्रोएशिया संघाचे सदस्य आणि माजी व्यवस्थापक इगोर स्टिमाक यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. एआयएफएफच्या तांत्रिक समितीने गुरुवारी प्रशिक्षक पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली. स्टिमाक हे, क्रोएशियाई संघाचे सदस्य होते. त्यांचे नाव तांत्रिक समितीने निवडले आहे. ते ५१ वर्षांचे आहेत.
तांत्रिक समितीचे अध्यक्ष श्याम थापा माध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही चार जणांच्या मुलाखती घेतल्यानंतर इगोर स्टिमाक यांच्या नावाची शिफारस अखिल भारतीय फुटबॉल महासंघच्या कार्यकारी समितीकडे केली आहे. भारतीय प्रशिक्षक बनण्यास ते योग्य उमेदवार आहेत. शुक्रवारी त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
स्टिमाक यांचा कार्यकाल ३ वर्षाचा असू शकतो. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून स्टिमाक यांच्या कामाला थांयलंड येथे होणाऱ्या किंग्ज कप आंतरराष्ट्रीय मालिकेपासून सुरुवात होईल.
स्टिमाक यांचा जन्म युगोस्लावियातील मेटकोविच या छोट्या शहरात झाला. त्यांनी क्रोएशयाकडून ५३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यांनी क्लब फुटबॉलचे ३२२ सामने खेळले आहेत. स्टिमाक २०१२ ते २०१३ पर्यंत क्रोएशिया संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.