जालना- औरंगाबादकडून जालना शहराकडे ६० लाखाची रोख रक्कम घेऊन जाणारी कार नागेवाडी टोल नाक्याजवळ पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी या कारमधून 60 लाख 24 हजार 500 रुपयासह दोन संशयितांना ताब्यात घेतले. याबाबत संशयितांकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
औरंगाबादकडून जालना शहराकडे रोख रक्कम घेऊन एक कार (क्र. एमएच-21, बीएफ-5157) पहाटेच्या सुमारास येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या महितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने नागेवाडी टोल नाक्याजवळ सापळा लावून पहाटे 3 च्या सुमारास संबंधित गाडी पकडली. गाडीची झडती घेतली असता, त्यात रोख 60 लाख 24 हजार 500 रुपये आढळून आले. या रक्कमेबाबत चौकशी केली असता, कारमधील संतोष आम्ले, सुरेश देशमुख (दोघेही रा. जालना) या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी रोख 60 लाख 24 हजार 500 आणि 12 लाख रुपये किंमतीची कार, असा एकूण 72 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन, तसेच औरंगाबाद आणि जालना हे दोन्ही जिल्हे रेडझोनमध्ये असताना या आधी देखील रोख रकमेची वाहतूक झाली होती. औरंगाबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी अशी वाहतूक करण्याचा प्रयत्न केला होता. ते देखील पकडल्या गेले होते.