ठाणे - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे काँग्रेस नेते खासदार हुसैन दलवाई यांनी स्पष्ट केले आहे. ठाण्यात आयोजित दोन्ही पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाण्यातील आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर आघाडीतर्फे हुसैन दलवाईंना समन्वयक म्हणून ठाण्यात पाठविण्यात आले. दोन्ही पक्ष आघाडीचा उमेदवार निवडणून आणण्यासाठी काम करतील असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार म्हणून आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण, काँग्रेसच्या ठाण्यातील नेत्यांनी त्यांना विरोध केला. ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काँग्रेसला अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून आनंद परांजपे यांचे काम करणार नसल्याचे कळवले होते. तर, दुसरीकडे भिवंडी मतदारसंघात सुरेश टावरे यांच्या ऐवजी सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती.
हुसैन दलवाई यांनी या दोन्ही वादाच्या मुद्यावर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची समजूत घातली. हे मतभेद तात्पुरते असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यात समन्वय साधण्यात येईल, असे सांगितले. भिवंडी मतदारसंघातून सुरेश टावरे हेच उमेदवार राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या उमेदवाराला हरविण्यासाठी आघाडीचे कार्यकर्ते एकत्र काम करतील असे दलवाई म्हणाले. यावेळी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे, काँग्रेस शहर अध्यक्ष मनोज शिंदे, सुभाष कानडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला उपस्थित होते.