मुंबई - दरवर्षी मुंबईत पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो यासारख्या आजारांचे रुग्ण आढळून येतात. या आजारांना अटकाव करण्यासाठी पालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये सुटीच्या दिवशी वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे आयोजित बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.
मुंबईत या आठवड्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी 'मॉन्सून'चे आगमन होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाळ्या दरम्यान मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो या आजारांचे प्रमाण अधिक असते. हे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका नागरिकांमध्ये जनजागृती करून आरोग्य सेवा देते.
याच अनुषंगाने कोरोना साथ नियंत्रणामध्ये जसे 'चेस द व्हायरस' हे सूत्र राबवून 'फिव्हर क्लिनीक्स'च्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमधून रूग्णांचा शोध घेतला गेला, त्याच धर्तीवर पावसाळी आजारांसाठी स्थानिक लोक प्रतिनिधींच्या सक्रिय सहकार्याने महापालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये प्रामुख्याने शनिवार रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांच्या दिवशी वैद्यकीय शिबीरे आयोजित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी बुधवारी एका विशेष बैठकी दरम्यान महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला आणि पालिका रुग्णालयांना दिले आहेत.
या आढावा बैठकी दरम्यान महापालिकेच्या सर्व 24 विभागातील विविध परिसरांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये यापूर्वी पावसाळी आजारांचा अधिक प्रादुर्भाव आढळून आला होता. त्या परिसरांमध्ये येत्या रविवार पासून वैद्यकीय शिबीरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या शिबिरांमध्ये सहभागी होण्यास आणि मदत करण्यास खासगी रुग्णालये स्वत:हून पुढे आल्यास त्यांचीही मदत घ्या, असेही महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले.