बीजिंग - तैवानच्या एअर डिफेन्स मिसाईल यंत्रणेचे नुतनीकरण करण्यासाठी अमेरिकेने नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानुसार हे काम अमेरिकेतील ‘लॉकहीड मार्टीन’ या शस्त्रास्त्रे बनविणाऱ्या कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनचा पारा चढला असून त्यांनी लॉकहीड मार्टीन या कंपनीवर निर्बंध घातले आहेत.
'तैवानला शस्त्र विक्री करण्यास चीनचा विरोध आहे. आमची अमेरिकेला विनंती आहे, त्यांनी 'वन चायना पॉलिसी'चा सन्मान राखावा. तैवानला शस्त्र विक्री करु नका, तसेच त्यांच्याबरोबरचे लष्करी संबंध तोडून टाका. त्यामुळे अमेरिका आणि चीन द्विपक्षीय संबंधांना धोका पोहचणार नाही आणि तैवान सामुद्रधुनी परिसरात शांतता आणि सुरक्षितता राहील, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिझिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
चिनीने राष्ट्रीय हिताचा विचार करता लॉकहीड मार्टिन कंपनीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कंपनी या करारातील महत्त्वाची भागीदार आहे, असे लिझिन म्हणाले.
तैवानची एअर डिफेन्स मिसाईल यंत्रणा सक्षम करण्याकरीता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने करार केला आहे. त्यानुसार 'पॅट्रियॉट एडव्हॉन्स कॅपॅबिलीटी' या एअर डिफेन्स मिसाईल यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. हा करार 62 कोटी डॉलरचा आहे. अमेरिकन काँग्रेसने आधीच या निर्णयाला मान्यता दिली आहे. अमेरिका आणि चीनचे संबंध ताणले असून अनेक आघाड्यांवर दोन्ही देशांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. अमेरिकेने नुकतेच जपानला लढाऊ विमाने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.