नागपूर - कोणत्याही परिस्थितीत रुग्णांचा जीव वाचला पाहिजे, या उद्देशाने व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन या वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेची गरज आहे. त्यादृष्ट्रीनेच विदर्भातील तरुण अभियंत्यांनी तयार केलेल्या पोर्टेबल व्हेंटीलेटरच्या उपयुक्ततेची तपासणी करावी, असे आदेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिले.
दुसऱ्या लाटेतील कोरोना स्ट्रेनच्या संसर्गाचे प्रमाण नागपुरात जास्त आहे. यामुळे रुग्णांची प्रकृती खालावून तो दोन-तीन दिवसात गंभीर होतो. ग्रामीण भागातून गंभीर वा अतिगंभीर रुग्णाला शहराकडे आणताना त्याला पोर्टेबल व्हेंटिलेटर मदतीचा ठरेल. याच पोर्टेबल व्हेंटीलेटरचे सादरीकरण पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या समोर आज करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यावेळी उपस्थित होते.
कोरोना रुग्णांना उपयुक्त ठरेल अश्या संयंत्राचे सादरीकरण -
शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील डॉ. वैशाली शेलगांवकरांनी या मशीनची तांत्रिक माहिती जाणून घेतली. कंपनीचे एम. डी. आकाश गडडमवार यांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या अन्य संयंत्राची देखील सादरीकरण व माहिती पालकमंत्र्यांना दिली.