ब्यूनस आयर्स : मार्क्सवादी क्रांतिकारक चे ग्वेरा याचे लहानपणीचे घर विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्जेंटिना देशातील रोसारिओ शहरात हे घर आहे.
गेल्या अनेक दशकांमध्ये या घराचे मालक वेळोवेळी बदलले आहेत. सध्या फ्रान्सिस्को फार्रुजिया नावाच्या एका व्यापाऱ्याकडे या घराची मालकी आहे. चे ग्वेराच्या लोकप्रियतेमुळे या घराची किंमत वाढली आहे. २०० वर्ग मीटर जागेत असलेल्या या घरासाठी ४ लाख डॉलर्स एवढी किंमत मागण्यात येत आहे.
फ्रान्सिस्को आधीपासूनच या घराला विकण्याचा विचार करत होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण आता यासाठी घाई करत असल्याचे त्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
चे ग्वेरा याचा जन्म १९२८मध्ये झाला होता. लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील बऱ्याच चळवळींचे नेतृत्व त्याने केले. १९६७ मध्ये बोलिव्हिया देशातील लष्कराने त्याला सुळावर चढवले होते. आजही मार्क्सवादी विचारसरणीचा चेहरा म्हणून चे ग्वेराला ओळखले जाते.