सांगोला (सोलापूर) - टेंभूच्या कामासाठी केंद्र सरकारने निधी दिल्यामुळेच या योजनेची कामे वेळेत पूर्ण झाली आहेत. त्यामुळेच उन्हाळ्यातही सांगोला तालुक्याला टेंभूचे पाणी मिळाल्याचे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे या निष्क्रिय राज्य सरकारकडून आमच्या अपेक्षा राहिल्या नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
भर उन्हाळ्यातही निरा उजवा कालव्याला पाणी सोडले आहे. तसेच टेंभूच्या कामासाठी केंद्र सरकारने भरघोस निधी दिला असल्याने या योजनेची कामे वेळेत कामे पूर्ण झाली. त्यामुळेच ऐन उन्हाळ्यात सांगोला तालुक्याला टेंभूचे मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. सांगोला तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी निंबाळकर हे मंगळवारी सांगोल्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार निंबाळकर म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मोठे व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. या काळात कर्ज पुरवठा न करणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल. तसेच शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा सांगोला तालुका आहे. संकटात रुतलेली चाके बाहेर काढण्यासाठी येणाऱ्या काळात खासदार म्हणून मी प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. कोरोनाच्या काळात राज्य शासनाने मदत म्हणून 20 रुपये सुध्दा दिले नाहीत. कोरोना रुग्णांचे आकडे सरकारने लपवल्याचा आरोप करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.
लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर फक्त बारा दिवसात निरा उजव्या कालव्याला हक्काचे पाणी परत आणले. सांगोला तालुक्याला पाणी मिळवून देण्यासाठी मी खंबीर आहे. आमचे पाणी पळवणाऱ्याचे पाणी कसे पळवायचे, यासाठी मी लढा देणार असल्याचे सांगत खासदार निंबाळकर यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाच्या वर्षपूर्ती निमित्त विविध कामांच्या अहवाल वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, अमरसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, नितीन कर्णे, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, शिवाजीराव गायकवाड, नगरसेवक आनंदा माने, गजानन भाकरे, श्रीकांत देशमुख, शशिकांत देशमुख, अभिजित नलवडे, अनिल(बंडू) केदार, शिवाजी घेरडे, संभाजी आलदर, साहेबराव पाटील, जयंत केदार, विजय बाबर, पुण्यवंत खटकाळे, बाळासाहेब सावंत, संजय पाटणे, सूर्याजी खटकाळे, दत्तात्रय जाधव, संजय केदार, नवनाथ भोसले, आनंद फाटे, नवनाथ पवार, शीतल लादे, वैजयंती देशपांडे, तानाजी कांबळे, भारत धनवडे, विलास व्हनमाने, माणिक सकट, देवा कांबळे, श्रीनिवास क्षीरसागर, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख यांच्या सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.