अयोध्या (उत्तर प्रदेश) - आयोध्येतील राम जन्मभूमी परिसर बौद्ध स्थळ असल्याचा दावा करत बौद्ध भिक्खूंनी मंगळवारी अयोध्येत उपोषण केले. तसेच यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती विभागाकडे (युनेस्को) या स्थळाचे उत्खनन करावे अशी मागणी केली. अयोध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध भिक्खूंनी आंदोलन केले. दरम्यान, त्यांनी राम जन्मभूमी परिसरात जमिनीचा भूभाग खणत असताना, मिळालेल्या वस्तु किंवा शिल्प हे सार्वजनिक करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
बौद्ध भिक्खूंनी राम मंदिर बांधकाम तातडीने थांबवावे अशी सुद्धा मागणी केली आहे. बौद्ध धर्माच्या अनुयायांचे म्हणणे आहे की, अयोध्या ही प्राचीन काळात साकेत शहर म्हणून ओळखल्या जात होती. साकेत हे बौद्ध धर्माचे केंद्रस्थळ असल्याचे मानले जाते. आंदोलक भिक्खूंनी सांगितले की, आम्ही आमच्या मागणी संंबंधीचे स्मरणपत्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश, राष्ट्रपती तसेच केंद्र सरकारच्या विविध संस्थांना पाठवले आहे. आमची मागणी मान्य केली नाही तर ही चळवळ मोठे रुप धारण करेन. फैजाबादचे तहसीलदारांनी आंदोलकांची दखल घेतली असल्याचे सांगितले आहे.
"रामाचा जन्म नेपाळमध्ये झाला"
मंगळवारी नेपाळच्या पंतप्रधानांनी श्रीरामाविषयी एका वेगळ्याच वादाल फोडणी दिली. खरी अयोध्या नेपाळमध्ये असून प्रभू श्रीरामाचा जन्मही नेपाळमधील थोरी या गावात झाला होता, असा दावा करत नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी वाद ओढवून घेतला. त्यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे.