गुरुदासपूर (पंजाब)- अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात सीमा सुरक्षा दलाला यश आले आहे. हा साठा पाकिस्तानातून रावी नदी मार्गे भारतात येत होता. यावेळी सजग असलेल्या जवानांना हा साठा दिसताच त्यांनी तो जप्त केला, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाने दिली आहे.
शनिवारी मध्यरात्री 2.45 च्या सुमारास नांगली येथील सीमा सुरक्षा चौकीतील सुरक्षा दलाच्या जवानांना रावी नदीत काही संशयित वस्तू वाहताना दिसल्या. या वस्तू पाकिस्तानकडून रावी नदीतून भारताच्या दिशेने वाहत होत्या. पथकाने हा संशयित माल नदीतून बाहेर काढला. त्यात 60 पाकिटे अमली पदार्थ एका दोरीला बांधून असल्याचे आढळले. 1 हजार 500 मीटर लांब असलेल्या या दोरीला नदीतून सामान ओढण्यासाठी लावले असावे, असा संशय सीमा सुरक्षा दलाकडून व्यक्त केला जात आहे.
यावर, जवनांना काल रात्री 2 च्या सुमारास रावी नदीमध्ये काही संशयास्पद हालचाली होताना दिसून आल्या होत्या. यावेळी कारवाई करण्यासाठी जवानांनी हालचाल केली, मात्र अंधाराचा फायदा घेत तस्कर फरार झाले. अशी महिती बीएसएफचे उप महानिरीक्षक राजेश शर्मा यांनी दिली.