नागपूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्येतदेखील भर पडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, बहुतांशी रुग्णांना लक्षणे नसल्यामुळे त्यांची चाचणी करून त्यांना आमदार निवासात दाखल केले जात आहे. त्यामुळे आता आमदार निवासातील 'कोविड केअर सेंटर'मधील खाटेत वाढ करण्यात आल्याचे पहायला मिळत आहे.
या पूर्वी आमदार निवसातील कोविड केअर सेंटरमध्ये 150 खाटांची क्षमता होती. आता मात्र नागपुरातील कोविड रुग्णांची सद्यस्थिती आणि रुग्णांची संख्या पाहता खाटांची संख्या 300 इतकी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे मेयो, मेडिकल आणि एम्स या रुग्णालयातून चाचणी करून बाहेर पडणाऱ्या रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्यामुळे अशा रुग्णांसाठी या सेंटरच्या खाटेत वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी नागपुरातील वाढत्या रुग्णांची संख्या पाहता कोविड सेंटर अधिक उभारावे लागतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.