अयोध्या (उ.प्र) - दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आज अयोध्येतील तात्पुरते राम मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आले. श्रीरामांची मूर्ती एका तात्पुरत्या बुलेटप्रुफ मंदिरात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे, यंदा भाविकांना दर्शनाचा वेगळाच अनुभव मिळत आहे.
देशातील मंदिरे उघडण्याबत गृह मंत्रालयाकडून नवे निर्देश जारी करण्यात आले. त्यानुसार फक्त 5 जणांना एकाचवेळी मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भाविकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करवून घेण्यासाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आतापर्यंत राम मंदिरात फक्त 100 नागरिकांनीच प्रवेश केल्याचे सांगितले.
देशात कोरोनाचे संकट वाढतच असल्याने राम मंदिराचे निर्माणकार्य पुढे ढकलण्यात आले आहे. राम मंदिरात प्रसादाचे वितरण व पवित्र जलाचा शिडकावा या कृती बंद करण्यात आल्या आहेत. मंदिरात प्रवेश करताना थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक करण्यात आले असून कोरोनाचे लक्षण नसलेल्या फक्त स्थानिक नागरिकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करवून घेण्यासाठी मंदिरातील फरशीवर खुणा करण्यात आल्या आहेत.
कोरोना काळात मार्च महिन्यात श्रीरामांची मूर्ती मानसभवन येथील एका तात्पुरत्या मंदिरात ठेवण्यात आली होती. लॉकडाऊन काळात मंदिर बंद होते, मात्र गृह मंत्रालयाच्या निर्देशांतर आज ते उघडण्यात आले आहे. तसेच सरकारने मंदिरात हँड सॅनिटायझर असणे बंधनकारक केले आहे.