औरंगाबाद- कन्नड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून समाधानकारक परिस्थिती आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेस सर्वतोपरी सूचना करण्यात आलेल्या आहेत.
सोबत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कन्नड तालुक्यासाठी ज्या काही सुविधा, यंत्रणा अथवा साहित्य, बाधित, संशयित्यांना ने आन करण्यासाठी लागणारी वाहने, मनुष्यबळ जे काही लागेल ते तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी चौधरी यांनी गजानन हेरिटेज येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, कन्नड तालुक्यातील आरोग्य विभाग नप प्रशासन पोलीस आणि महसूलचे अधिकारी कर्मचारी चांगले काम करत आहे. आरोग्य विभाग सुरुवातीपासून चांगले काम करत आहे. तरीही यापुढे प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी, आमदार उदयसिंग राजपूत, नगराध्यक्षा स्वातीताई संतोष कोल्हे, जिल्हा माहिती अधिकारी, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, नप मुख्याधिकारी नंदा गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लांजेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्ता देगावकर, डॉ.प्रवीण पवार, नायब तहसीलदार हरून शेख, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, शिवसेना तालुका प्रमुख केतन काजे यांची उपस्थिती होती.