नागपूर - शेकडो वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. आज या राम जन्मभूमीत मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील प्राचीन वैभवांपैकी एक असलेल्या पोदारेश्वर राम मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमीत आज राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच, देशभरातील मंदिरांमध्ये रोषणाई करण्यात आली आहे. नागपूरमध्येही राम मंदिरात राम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तींना विशेष रुपाने सजवण्यात आले आहे. कोरोनामुळे भक्तांना मंदिरात प्रवेश नसला तरी राम नवमी आणि दिवाळी प्रमाणे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे.
आज अयोध्येत होणाऱ्या भूमिपूजना प्रसंगी नागपूर शहरात प्रचंड उत्साह सांचारला आहे. शहरातील प्रमुख मंदिरांना सजवण्यात आले आहे. ठिक-ठिकाणी लाडू वाटले जाणार आहेत. भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला रामाच्या मंदिरावर करण्यात आलेल्या रोषणाईमुळे वातावरणात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले आहे.