रायगड - अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर व किहीम येथील बंगल्यामधून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट व कोकेन बाळगल्याप्रकरणी 4 महिला, 5 पुरुष आरोपी व 7 पीडित अभिनेत्रींना स्थानिक गुन्हे पथकाने छापा टाकून अटक केली होती. या प्रकरणात अजून पाच जणांना कोकेन दिल्याबद्दल अटक केली आहे. त्यांच्याकडून 50 ग्रॅम कोकेन जप्त केले असून त्याची 2 लाख 65 हजार किंमत आहे. यातील मुख्य आरोपी राखी नोटानी व रंजिता सिंग ऊर्फ रेणु व पकडलेल्या पाच आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच इतर 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हुसैन मुझफ्फर रझानी, मनिष दौलत टुकरेल, ओकोरो ल्यक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी (नायझेरीयन नागरीक), दिपक अर्जुन अगरवाल या पाच जणांना मुंबईतून अटक केली आहे.
अलिबागमध्ये बर्थडे पार्टीच्या माध्यमातून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे विभागला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये 9 आरोपींना व 7 हिंदी मालिकेत काम करणाऱ्या पीडित अभिनेत्रींना अटक केली होती. आरोपींकडून 26 ग्रॅम कोकेनही जप्त करण्यात आले होते. या प्रकरणातील 9 आरोपींना न्यायलायत हजर केले असता 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती तर पीडित अभिनेत्रींना पालकांच्या स्वाधीन केले होते.
स्थानिक गुन्हे पथकाने पकडलेल्या आरोपींकडे कोकेनबाबत अधिक चौकशी केली असता मुंबई येथून कोकेन घेतल्याचे कळले. त्यानुसार स्थानिक गुन्हे पथकाने मुंबई येथून ओकोरो ल्यक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी या दोन नायझेरियन नागरिकांना व हुसैन मुझफफर रझानी, मनिष दौलत टुकरेल, दिपक अर्जुन अगरवाल असे पाच जणांना कोकेन दिल्याबद्दल अटक केली आहे, तर या पकडलेल्या आरोपींकडून 50 ग्राम कोकेनही जप्त केले आहे.
9 आरोपीना व पकडलेल्या 5 आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता मुख्य आरोपी राखी नोटानी व रंजिता सिंग ऊर्फ रेणु यांना 9 जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनावली. राजकमल, निकेश मोदी, वरुण अदलखॉ, सईद अमीर रज्जाक तसेच सिमा सिंग, श्रुती गावकर, आरोही सिंग यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.