परभणी - जिल्ह्यातील गंगाखेड पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करून उभे करण्यात आलेला ट्रॅक्टर काही चोरट्यांनी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे. दरम्यान, चोरटे जर पोलीस ठाण्यात लावलेला ट्रॅक्टर चोरण्याचे धाडस करत असतील तर सामान्यांच्या घरासमोरील वाहनांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
गंगाखेड महसूल प्रशासनाने दोन वर्षापूर्वी वाळू माफियांवर कारवाई करून एक ट्रॅक्टर जप्त केले होते. रेती घेऊन जाणारे हे ट्रॅक्टर तेव्हापासून गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये उभे आहे. मात्र सदर ट्रॅक्टर काल रात्री अज्ञात 5 ते 6 चोरट्यांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. महसूल-6 असे या ट्रॅक्टरच्या हेडवर नाव लिहिलेले असून, ट्रॅक्टरचे हेड चोरट्यांनी ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या खड्ड्यापर्यंत ओढत नेले. तेथून पुढे पळवून नेण्याचा प्रयत्नात असतानाच तेथे गस्तीवर असलेली पोलिसांची गाडी आली. पोलिसांना पाहताच चोरटे ट्रॅक्टरचे हेड सोडून पसार झाले.
पोलिसांनी त्यानंतर चोरट्यांचा बराच शोध घेतला, परंतु चोरटे सापडले नाहीत. पोलीस स्थानकातून जप्त केलेल्या ट्रॅक्टरची जर चोरी होत असेल, तर सर्वसामान्य लोकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांची काय सुरक्षा असेल ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दरम्यान, या चोरीच्या प्रयत्नामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. तर चोरट्यांनी थेट पोलीस ठाण्यातच चोरी करण्याचे धाडस दाखवून पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.