हैदराबाद - अल्जारी जोसेफने घेतलेले ६ बळी आणि किरोन पोलार्डच्या ४६ धावांच्या जोरावर मुंबईने हैदराबादला त्यांच्याच मैदानावर ४० धावांनी पाणी पाजले. मुंबईचा हा सलग तिसरा विजय ठरला.
या सामन्याचा हिरो ठरला तो म्हणजे अॅडम मिल्नेच्या जागेवर खेळणारा अल्जारी जोसेफ. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच अर्धाडझन विकेट घेत आयपीएलमधील ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
आयपीएलच्या पहिल्या मौसमात पाकच्या सोहेल तन्वीरने राजस्थानच्या संघाकडून चेन्नईविरुद्ध खेळताना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. त्याने १४ धावा देत ६ गडी बाद केले. त्याचा हा विक्रम अल्जारीने काल मोडीत काढला. अल्जारीने ३.४ षटकात एक षटक निर्धाव टाकत १२ धावात ६ गडी बाद केले. तसेच यंदाच्या आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकण्याचा पराक्रम केला.
आयपीएलचा पहिला सामना खेळणाऱ्या जोसेफने त्याच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेडूवर वॉर्नरच्या यष्ट्या उद्धवस्त केल्या. त्यानंतर सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर विजय शंकरला बाद केले. त्यानंतर दीपक हुडा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल यांना बाद करत त्याने हा विक्रम केला.