अकोला- राजस्थान येथे राजकीय पेच निर्माण करून भाजपा तिथे सत्ता स्थापन करीत आहे. भाजपा घोडेबाजार करीत असून त्यांची ही प्रक्रिया लोकशाहीला काळीमा फासणारी आहे, असा आरोप करत युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने देऊन भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
केंद्रातील भाजपा सरकारकडून व भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने देशात होत असलेली लोकशाहीची पायमल्ली, व लोकशाही पद्धतीने निवडून आलेली सरकारे अस्थिर करणे, किंवा घोडेबाजार करून वातावरण दूषित करून ती सरकारे पाडणे, असे गलिच्छ व कपटी राजकारण सध्या केले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते महेश गनगणे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, भाजपातर्फे होत असलेला हा प्रकार म्हणजे लोकशाहीची सरसकट हत्याच आहे. याच्या विरोधात युवक काँग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेस, युवक काँग्रेससह आदी आघाडींचा सहभाग होता, असे युवक काँग्रेसचे नेते महेश गनगणे यांनी सांगितले.