अकोला - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या पंधरा वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या परिचारिकांना नोकरीत कायमस्वरूपी समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा शुक्रवारी चौथा टप्पा असून 'कामबंद' तसेच 'अधिकारी झोडो' आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनसेवेमध्ये नियमित स्वरुपात समाविष्ट करण्यासाठी 19 मेपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहे. आता या आंदोलनाचा चौथा टप्पा सुरू आहे. या आंदोलनात सर्व कर्मचारी स्वरक्षण किट न वापरता कोविड कक्षामध्ये सेवा देत आहेत. कंत्राटी कर्मचारी अत्यंत धोकादायक वातावरणात कर्तव्य बजावत आहेत. मात्र, प्रशासन आणि शासनाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आम्ही अत्यंत शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहोत. परंतु शासनाची असंवेदनशीलता पाहता आम्ही आंदोलन तीव्र केले आहे. आमच्या आंदोलनाचा चौथा टप्पा शुक्रवारपासून सुरू झाला आहे. कामबंद आंदोलनासोबतच जे अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांची बाजू शासनासमोर शासनासमोर मांडत नाहीत, अशा अधिकाऱ्यांना घेराव घालून अधिकारी झोडो आंदोलनही करण्यात येईल.
राज्यातील आरोग्य विषयासंदर्भातील आणीबाणी पाहता शासनाने आमच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीने केली आहे.