चंद्रपूर - चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मासळ चौक परिसरात अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त केला असून आरोपी चंद्रगुप्त मांडवकर याला अटक केली आहे.
राज्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी दारू विक्री सुरू झाली. यावर अंकूश लावण्यासाठी चिमूर पोलीस प्रयत्न करत आहे. दारम्यान, चिमूर येथील अवैद्य दारू तस्कर चंद्रगुप्त मांडवकर (वय 28, रा. ठक्कर वार्ड) हा आपल्या पांढऱ्या रंगाच्या इंडिका क्र. (एमएच. 40 केआर 0228) वाहनाने रात्रीच्या सुमारास देशी विदेशी दारू साठा विक्रीकरिता आणत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मासळ चौक चिमूर येथे पोलिसांनी सापळा रचला. आरोपी चंद्रगुप्त मांडवकर आपल्या इंडिका कारने या परिसरात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली व त्याचे वाहन जप्त केले.
वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी, विदेशी दारूसाठा आढळून आला. हा अवैध दारूसाठा व वाहन असा एकूण 4 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाही पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप-निरीक्षक अलीम शेख, पो. हवा. विलास सोनुले, विलास निमगडे, पो. शि. सतीश झिलपे, दगडू सरवदे चाना, पो. शि. कैलास वनकर यांनी केली.