यवतमाळ- जिल्ह्यात आज दिवसभरात 9 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर विलगीकरण वॉर्डात भरती असलेला एक रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली आहे. आज नव्याने आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पुसद शहरातील 4, दारव्हा शहरातील 4 आणि एक जण नेर येथील आहे. यात 6 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.
पुसद येथील 20, 25, 27 वर्षीय पुरुष आणि 55 वर्षीय महिला, दारव्हा येथील 29 आणि 54 वर्षीय पुरुष तर 35 आणि 55 वर्षीय महिला, तसेच नेर येथील 35 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 42 होती. यात आज एका जणाला सुट्टी झाल्यामुळे ही संख्या 41 वर आली. मात्र आज नव्याने 9 पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्यामुळे सद्यस्थितीत अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 50 वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 171 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 9 पॉझिटिव्ह तर 162 अहवाल निगेटिव्ह आहेत. शासकीय महाविद्यालयाने आज 14 नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 2 हजार 992 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 2 हजार 961 अहवाल प्राप्त झाले असून 31 अहवाल अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 207 वर पोहोचली आहे. यापैकी 149 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर जिल्ह्यात 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.