बुलडाणा- जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्याच प्रमाणात रुग्ण बरे होणाऱ्या संख्येतही वाढ होत आहे. जिल्ह्यातील 91 व्यक्तींचे स्वॅब अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 91 अहवाल आज प्राप्त झाले असून त्यातील 83 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 8 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह अहवालांमध्ये धामणगाव बढे (ता. मोताळा) येथील 22 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 5 वर्षाची मुलगी व 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तसेच मलकापूर येथील 52 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय वृद्ध महिला, नांदुरा येथील 37 वर्षीय महिला व समर्थ नगर खामगाव येथील 53 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच मलकापूर येथील 19 जून 2020 रोजी दाखल 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला होता, त्याचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूसंख्या 8 झाली असून 165 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
त्याचप्रमाणे आज 8 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार सुट्टी देण्यात आली आहे. शेगाव कोविड रुग्णालयातून पातुर्डा (ता. संग्रामपूर) येथील 22 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला यांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच खामगाव कोविड रुग्णालयातून चिखली, (ता. खामगाव) येथील 25 वर्षीय पुरुष रुग्णाला डिस्जार्ज देण्यात आला. तर बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून भीमनगर, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय तरुण, 60 वर्षीय पुरुष आणि 9 वर्षीय मुलाला सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये मलकापूर व संग्रामपूर तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. तसेच लोणार, सिंदखेड राजा, दे. राजा, चिखली व बुलडाणा तालुक्यात सध्या एकही अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण नसल्यामुळे हे तालुके कोरोनामुक्त आहेत. मात्र मलकापूर येथे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 3 दिवसांची संचारबंदी पाळण्यात येत आहे.
आतापर्यंत 2 हजार 254 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 165 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत 122 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात 35 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तसेच आज रोजी 12 अहवाल प्रतिक्षेत आहे.