लातूर - जिल्ह्यामध्ये शनिवारी 13 कोरोना रुग्णांची भर पडल्यानंतर रविवारी पुन्हा 5 कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा पन्नासच्या पुढे गेला आहे. लातूर शहरासह उदगीर आणि निलंगा तालुक्यात हे रुग्ण आढळून आले आहेत.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी लातूर शहरातील मोती नगर, भुसार लाईन आणि औसा रोडवरील सरस्वती कॉलनी येथे प्रत्येकी 1 नवा कोरोना रुग्ण आढळला आहे. या सर्वांवर येथील विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. तर उदगीर शहरात एक आणि निलंगा तालुक्यातील चांदोरी येथेही एक रुग्ण आढळून आला आहे.
उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ही 53 वर गेली आहे. यापूर्वी आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. विशेषतः लातूर आणि उदगीर शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी म्हटले आहे.