लातूर- निलंगा शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता शहरातील व्यापारी व सामाजिक संघटनांनी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्व व्यापाऱ्यांनी एक मतानी शहरात 5 दिवस स्वयंघोषित बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयी प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले. परंतु त्यांनी शासकीय बंदला परवानगी दिली नाही व स्वयंघोषित बंदला आमचा विरोध पण नाही, अशी भूमिका घेतली आहे.
सर्व व्यापाऱ्यांनी शहरातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा बघता हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शहरात 3 दिवसात एकूण 19 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दत्त नगर, दादापीर दरगाह परिसर, इंदिरा चौक, कुडुंबले रुग्णालय परिसर, इंदिरा कन्या शाळा परिसर हा कन्टेन्मेंट झोनमध्ये आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक विकास माने यांनी शहरात कन्टेन्मेंट झोनला भेट देऊन नागरिकांना काळजी घेण्याचे सांगितले आहे. तसेच विनाकारण शहरात फिरू नका, मास्क लावूनच बाहेर पडा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल असे बजावले आहे.
बैठकीत कापड दुकाने, सलून संघटना, हॉटेल मालक, पान टपरी धारक, डॉक्टर, फेरीवाले या लोकांनी 5 दिवस शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी अरविंद पाटील निलंगेकर, दत्ता शाहीर रेशमे गुरूजी, अकबर तांबोळी, सुधाकर माकणीकर, लालासाहेब देशमुख, लिंबन प्रल्हाद बाहेती दिलीप रंडाळे यांच्यासह शहरातील व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.