पुणे- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच आता या आजारामुळे रुग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ होताना दिसून येत आहे. मागील 24 तासात पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात तब्बल 44 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 1 हजार 508 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 730 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 976 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत पुण्यात कोरोनाची बाधा झालेले एकूण 37 हजार 386 रुग्ण सापडले आहेत. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 22 हजार 611 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 13 हजार 799 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील 557 रुग्ण गंभीर असून यातील 94 जण व्हेंटिलेटरवर आहेत.