पुणे - शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खुनाचा प्रकार उघडकीस आला. एका 35 वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आला. या महिलेची ओळख पटू नये, यासाठी तिचा चेहरादेखील छिन्नविछिन्न करण्यात आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक महेंद्र शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, लोहगाव परिसरात डी. वाय. पाटील महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अंदाजे 35 वर्षीय महिलेचा हा मृतदेह होता. भला मोठा दगडाने या महिलेचा खून करण्यात आला होता. तिची ओळख कोणाला पटू नये यासाठी तिचा चेहरा छिन्नविच्छिन्न करण्यात आला होता.
मृत महिलेच्या अंगावर मोरपंखी रंगाचा गाऊन आहे आणि तिच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ S A असे इंग्रजीत गोंदलेले आहे. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.