परभणी - आज सकाळी परभणी शहरातील आझाद कॉर्नर परिसरातील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या 22 झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या 24 तासात 17 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 498 एवढी झाली आहे. त्यातील 233 रुग्णांना आतापर्यंत सुट्टी देण्यात आली आहे, तर सद्यपरिस्थितीत 243 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात चालू आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल (25 जुलै) अपवाद वगळता मागच्या सहा दिवसात दररोज रुग्णांचा मृत्यू झाला असून आज सकाळी देखील परभणी शहरातील आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही 65 वर्षीय महिला इतर काही आजारांनी देखील त्रस्त होती. त्यातच तिला कोरोनाची बाधा झाल्याने 24 जुलैला जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज सकाळी तिचा मृत्यू झाला. या महिलेसह जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या बळींची संख्या 22 एवढी झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रॅपिड टेस्ट अँटिजेन करण्यात येत आहेत. नुकतेच त्यासाठी 5 हजार किट उपलब्ध झाल्या आहेत. या झटपट तपासणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि इतर रेड झोनमधून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या केवळ 25 दिवसात जिल्ह्यात जवळपास 400 रुग्णांची भर पडली आहे.
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 17 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये एकट्या गंगाखेड शहरात 12 रुग्ण आढळले आहेत. यात सराफा लाईन भागातील 35 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय पुरुष आणि 6 व 11 वर्षांची दोन मुले कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच गंगाखेडच्या नगरेश्वर गल्लीत 21 वर्षीय पुरुष तर रोशन मोहल्ला येथील 38 वर्षीय पुरुष, गुलजार कॉलनीतील 37 वर्षीय पुरुष आणि मेन रोडवरील 17 वर्षीय युवतीसह 49 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे.
याप्रमाणेच जैदिपुरा भागात 28 वर्षे तरुण आणि पोस्ट ऑफिस जवळ 41 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच गंगाखेड तालुक्यातील ईसाद येथे 70 वर्षाच्या वृद्ध महिलेसह 55 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गंगाखेड तालुक्यात आतापर्यंत 211 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. गंगाखेडमध्ये 25 जूनला पार पडलेल्या एका शाही विवाह स्वागत सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही रुग्ण संख्या वाढत चालली आहे. ज्यामुळे गंगाखेड शहरात रॅपिड टेस्ट मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत.
व्यापाऱ्यांना देखील दुकाने उघडण्यापूर्वी तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय परभणी शहरातील शिवराम नगरात एका 44 वर्षीय महिला तर तालुक्यातील पिंगळी येथील 35 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच सेलू शहरातील पारख कॉलनीतील 46 वर्षीय महिला तर मोंढा भागातील 50 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
गेल्या 24 तासात आढळलेल्या 17 रुग्णांसह परभणी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 498 वर पोहोचला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 233 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे, तर 22 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे उर्वरित 243 रुग्णांवर सद्यपरिस्थितीत उपचार सुरू आहेत.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 615 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 3 हजार 903 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 498 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 125 रुग्णांचा अहवाल अनिर्नित असून 52 जणांचे अहवाल फेटाळण्यात आले आहेत.
तसेच, सद्यपरिस्थितीत 42 रुग्णांचे अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत. समाधानाची बाब म्हणजे, काल दिवसभरात 12 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. ज्यामध्ये परभणी शहरातील वड गल्लीत राहणाऱ्या 17 व 22 वर्षाच्या 2 तरुणांसह देशमुख गल्लीतील 22 वर्षीय तरुणी आणि 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याप्रमाणेच सरफराज नगरातील 30 वर्षीय तरुण आणि सद्गुरुनगरातील 39 वर्षीय पुरुष व परभणी तालुक्यातील दैठणा येथील 32 वर्षीय महिला आणि 42 वर्षीय पुरुषाला सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, गंगाखेड शहरातील 48 वर्षीय पुरुष आणि सेलू शहरातील 30 वर्षीय महिलेसह 3 वर्षाच्या चिमुकल्याला व 62 वर्षीय महिलेला देखील कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.