जळगाव- जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या संख्येने वाढतच आहे. आज जिल्ह्यात तब्बल 226 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 6 हजार 393 इतकी झाली आहे.
विशेष म्हणजे, एका दिवसात 226 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असताना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. आज एकाच दिवसात 147 बाधित रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. त्याला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आठवडाभराचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्या काळातही बाधितांची संख्याही दीडशेच्या वरच आढळून येत होती. आज जिल्हा प्रशासनाने तपासणीसाठी पाठविलेले 1 हजार 197 स्वॅबचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यात 704 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून,ल 226 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू-
जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 343 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आज एका दिवसात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. सद्यस्थितीत 2 हजार 163 कोरोनाबाधित व्यक्ती हे कोरोना रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
अशी आहे कोरोना बाधितांची संख्या
जळगाव शहर 94, जळगाव ग्रामीण 28, जामनेर 25, चोपडा 24, अमळनेर 21, भुसावळ 10, भडगाव 5, एरंडोल 5, धरणगाव, पारोळा प्रत्येकी 3, पाचोरा, यावल प्रत्येकी 2, चाळीसगाव, बोदवड, दुसऱ्या जिल्ह्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 226 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले आहेत.