जळगाव- जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर सुरूच आहे. जिल्हा प्रशासनाला आज रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये नवीन 217 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजही सर्वाधिक 98 रुग्ण हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरातच आढळले आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. काल तर एकाच दिवशी तीनशेहून अधिक रुग्ण आढळलेत. शनिवारी पुन्हा 217 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. चिंतेची बाब म्हणजे, एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असताना दुसरीकडे, कोरोनाच्या बळींची संख्याही सातत्याने वाढतच चालली आहे. शनिवारी एकाच दिवसात 10 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन रुग्ण 48 वर्षांचे, तर उर्वरित सर्व रुग्ण 50 वर्षांवरील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 381 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
आज २३४ व्यक्ती झाले कोरोनामुक्त-
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेच, पण आज पॉझिटिव्ह आलेल्यांपेक्षा कोरोनामुक्त होवून घरी जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. शनिवारी 234 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात एकूण बरे होणाऱ्यांची संख्या 4 हजार 652 इतकी झाली आहे.
इतके आढळले रुग्ण-
जळगाव शहर 98, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 16, अमळनेर 10, चोपडा 11, पाचोरा 5, भडगाव 2, धरणगाव 2, यावल 5, एरंडोल 23, जामनेर 12, रावेर 16, पारोळा 1, चाळीसगाव 10, मुक्ताईनगर 1, बोदवड 1 व इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 217 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 7 हजार 492 इतकी झाली आहे.