पुणे - एनआयएने पुण्यातील कोंडवा व येरवडा येथून अटक केलेल्या नबील खत्री (27), सादिया अन्वर शेख या दोन आरोपींना अटक केल्यानंतर मोठा खुलासा आरोपींच्या चौकशीतून समोर आला आहे. पुण्यात कोंडवा परिसरात जिम चालविणाऱ्या नबील व बारामती येथे मास कम्युनिकेशनच्या द्वितीय वर्षात शिकत असलेल्या या दोघांचा इस्लामिक स्टेट खोरसन प्रॉव्हिन्स या संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे.
8 मार्च 2020 रोजी दिल्लीतीत स्पेशल सेलमध्ये या संदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला होता. हा गुन्हा जहाँनझेब सामी वाणी व त्याची बायको हिना बशीर बेग या दोन काश्मिरींची अटक झाल्यानंतर दाखल करण्यात आला होता. हे दोघेही इस्लामिक स्टेट खोरसन प्रॉव्हिन्स या बंदी घालण्यात आलेल्या संघटणेचे सदस्य असून तिचा आतंकवादी संघटना 'आयएसआयएस'शी संबंध आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे अब्दुल्हा बासिथ या आतंकवाद्याच्या संपर्कात होते, जो सध्याच्या घडीला एका वेगळ्या प्रकरणात तिहार जेलमध्ये कैद आहे.
देशात घातपाती कारवायांसाठी करत होते तरुणांची भरती-
सादिया शेख ही गेल्या काही महिन्यांनापासून जहाँनझेब सामी वाणी व त्याची बायको हिना बशीर बेग व अब्दुल्हा बासिथ या तिघांच्या संपर्कात वेगवेगळ्या सोशल मेसेजिंगच्या माध्यमातून संपर्कात होती. भारतात 'आयएसआयएस' ची विचारधारा रुजवून देशविरोधी कारवाया कारण्यासाठी तरुणांचा एक गट तयार केला जात होता, ज्यात सादिया हिची मुख्य भूमिका होती.
नबील खत्री याच्यावर भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी लॉजिस्टिक सपोर्ट देण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यात बनावट सिम कार्ड, शस्त्रे व स्फोटकांचा साठा जमविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सादिया शेख ही 2015 पासून वेगवेगळ्या सोशल माध्यमांच्या द्वारे 'आयएसआयएस' च्या हँडलरच्या संपर्कात आली होती. जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाई करण्यासाठी ती प्रयत्नात असताना 2018 मध्ये तिला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली होती.