सोलापूर- शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजारापर्यंत गेली आहे. आज 153 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरात लॉकडाऊन असून रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे.
कोरोनाची लागण झालेल्या व्यंक्तीमध्ये कोणतीही लक्षणे नसलेल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. आज एकून 1 हजार 10 जणांचा स्वॅब घेण्यात आला होता. यातील 153 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. तर 857 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. संचारबंदीच्या काळात प्रत्येक व्यक्ती हा घरातच असल्यामुळे शहरात रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या वाढविण्यात आली आहे. या टेस्टच्या माध्यमातून मागील 3 दिवसात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या वाढलेली आहे.
आतापर्यंत एकूण 20 हजार 283 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी 16 हजार 254 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तर 3 हजार 988 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. 41 व्यक्तींचा अहवाल हा अजून प्रलंबित आहे. 2 हजार 191 जण हे कोरोनातून बरे होऊन घरी गेलेले आहेत. तर 1 हजार 468 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रॅपिड अँटिजेन टेस्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची तपासणी करून कोरोनाबाधितांना समान्यांपासून वेगळे करणे. तसेच, कोरोनाचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.