ठाणे - भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध कुस्तीगिराचा कल्याण - शीळ रोडवरील वाकलन गावात कुस्तीच्या आखाड्यातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परशुराम झिपऱ्या पाटील ( वय ६५ ) असे कुस्ती खेळत असताना मृत्यू झालेल्या पैलवानाचे नाव आहे. ते भिवंडी तालुक्यातील जुनादूर्खी गावचे रहिवाशी होते.
मृत परशुराम यांना शालेय जीवनापासूनच कुस्ती खेळाची आवड असल्याने वयाच्या साठीनंतर देखील ते कुस्ती खेळत होते. शरीर बळकट राहावे यासाठी ते रोजचा १५ ते २० किमी. प्रवास पायीच करीत असत. कुस्ती खेळ कायम टिकून राहावा यासाठी शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी परशा वस्ताद गेल्या अनेक वर्षांपासून आखाडा चालवत आहेत.
ठाणे तालुक्यातील वाकलन गावच्या जत्रेनिमित्त रविवारी सायंकाळी कुस्ती स्पर्धा असल्याने त्यांचा सरवली येथील मित्र गजानन चौधरी यांच्या सोबत ते कुस्ती खेळण्यासाठी गेले होते. त्यांच्याशी आयोजकांनी एका कुस्तीपटूसोबत सामना लावला. यावेळी दोघा कुस्तीपटूंमध्ये सामना रंगला असता, प्रतिस्पर्धी खेळाडूने परशा वस्ताद यांना जमिनीवर आपटले. त्यावेळी त्यांच्या डोक्याची नस दबल्याने ते जागेवरच बेशुद्ध पडले. त्यांना सहकारी गजा वस्ताद यांनी तात्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येऊन रात्री उशिराने त्यांच्यावर जुनांदूर्खी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.