बिकानेर (राजस्थान) : Youth Beaten Half Naked : राजस्थानच्या प्रतापगढमध्ये एका महिलेची नग्न धिंड काढण्याचं प्रकरण ताज असतानाच आता राजस्थानमधूनच माणुसकीला काळीमा फासणारी आणखी एक घटना उघडकीस आलीय. बिकानेरच्या महाजन पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाला अर्धनग्न करून बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
४ आरोपींना अटक केली : या प्रकरणी पीडितच्या भावाने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आत्तापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे. मात्र ही घटना कधी घडली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस अधिकारी गणेश विश्नोई यांनी ही माहिती दिली.
पोलिसांची चौकशी सुरू : झालं असं की, पीडित व्यक्ती त्याच्या मित्रासोबत बिकानेरच्या महाजन पोलीस स्टेशन परिसरात आली होती. तेव्हा तेथील रहिवासी दिनू, बाबुलाल, सोनू आणि रोशन यांनी त्याचे हात बांधून त्याला बेल्टनं बेदम मारहाण केली. अद्याप या मारहाणीमागचं कारण समजलं नाही. पीडितचे जबाब आणि आरोपींची चौकशी केल्यानंतरच प्रकरणाचा उलगडा होईल, असं महाजन पोलिस ठाण्याचे अधिकारी गणेश बिश्नोई यांनी सांगितलं. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
चामड्याच्या बेल्टनं मारहाण केली : या व्हायरल व्हिडिओमध्ये एका घराच्या खोलीत काही लोक अर्धनग्न तरुणाला चामड्याच्या बेल्टनं मारहाण करताना दिसत आहेत. मारहाणीदरम्यान आरोपींनी व्हिडिओही बनवला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी चार आरोपींना अटक केली. पीडित आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रतापगढमध्ये महिलेची निर्वस्त्र धिंड : एका दिवसापूर्वी, राजस्थानच्या प्रतापगढमधून असाच एक व्हिडिओ समोर आला होता. येथं एका महिलेला तिच्या पतीनं आणि सासरच्या लोकांनी बेदम मारहाण करत तिची निर्वस्त्र धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. खुद्द मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा :