कोल्लम(केरळ) - केरळमधील कोल्लम जिल्ह्यात सोमवारी एका 24 वर्षीय नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. एस. वी. विस्मया असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती एक राज्य सरकारी कर्मचारी आहे. विस्मयाच्या माहेरच्या नातेवाईकांनी तिच्या पतीवर हुंड्यासाठी खून केल्याचा आरोप केला आहे. विस्मया ही एक आयुर्वेदिक डॉक्टर होती.
दरम्यान, मृत्युपूर्वीही तिने आपल्या पतीवर अत्याचार करणे, मारहाण करणे असे अनेक आरोप केले होते. सध्या तिचा पती किरणकुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला नोकरीवरून काढण्यात आले आहे.
- लग्नात दिल्या होत्या लाखोंच्या भेटवस्तू -
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी विस्मया आणि किरणकुमार यांचे लग्न झाले होते. त्यावेळी 14 लाखांची कार, एक एकर जमीन आणि 100 सोन्याचे नाणी भेट म्हणून दिली होती. हे सगळं देऊनही हुंड्यासाठी अत्याचार करून तिची हत्या केली असल्याचा आरोप विस्मयाच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
- जीवाला धोका असल्याची दिली होती नातेवाईकांना माहिती -
विस्मयाचा मृतदेह सोमवारी(21 जून) लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. तर एक दिवस आधी म्हणजेच रविवारीच व्हॉट्स अॅपवर आपल्या नातेवाईकांना मेसेज पाठवून जीवाला धोका असल्याचे तिने सांगितले होते. हुंडा आणण्यासाठी तिचा पती सतत छळ करत असल्याचे तिने म्हटले होते. तिचा नवरा एस. किरणकुमार हा राज्य सरकारच्या परिवहन विभागात कामाला आहे.
- दोषींना कठोर शिक्षा केली जाईल - तपास अधिकारी
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी आयजी हर्षिता अटलुरी यांच्याकडे आहे. तपास अधिकाऱ्यांनी निलमेल येथील विस्मयाच्या घरी भेट दिली. दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, विस्मयाच्या मृत्यूचे पुरावे आमच्याकडे असल्याची माहिती तपास अधिकारी हर्षिता अटलुरी यांनी दिली आहे.