नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी मंगळवारी जंतर-मंतर ते इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च काढला. या मोर्चात खाप प्रतिनिधीसह माजी राज्यपाल सत्यपाल मलिकही पोहोचले. त्यांच्याशिवाय पालम 360 गावचे प्रमुख सुरेंद्र सोलंकी, काँग्रेस नेते कृष्णा पुनिया यांच्यासह हजारो लोक मोर्चात सामील झाले.
फोगटने समर्थनाबद्दल आभार मानले : यावेळी या मोर्चात सहभागी झालेल्या समर्थकांनी केंद्र सरकार आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर कुस्तीपटू जंतरमंतरवर परतले. पत्रकार परिषदेत महिला कुस्तीपटू विनेश फोगटने लोकांच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल आभार मानले. ती म्हणाली की, या मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते, त्यामुळे आम्हाला जंतरमंतर ते इंडिया गेटपर्यंत कोणतीही अडचण आली नाही. आमची ही पदयात्रा सहज पूर्ण झाली आणि त्यासाठी आम्ही देशवासीयांचे आभार मानतो.
संसद भवनासमोर महिलांची महापंचायत होणार : फोगट म्हणाली, 'आम्ही आंदोलन करून आज महिना झाला, पण आजतागायत आम्हाला न्याय मिळालेला नाही. हा लढा फक्त आपला नाही तर संपूर्ण देशाच्या मुलींचा आहे. आम्हाला न्याय मिळाला तर समजा त्या सर्व मुलींना न्याय मिळेल, ज्यांच्यासोबत अशा घटना घडल्या आहेत. विनेश फोगट पुढे म्हणाली की, येत्या 28 मे रोजी नवीन संसद भवनासमोर महिलांची महापंचायत होणार आहे. आमची भविष्यातील रणनीती काय असेल यावर आमच्या खाप पंचायतींशी चर्चा सुरू आहे. जो काही निर्णय होईल, त्यानुसार आम्ही पुढे जाऊ.
न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला की, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली, ही देशाच्या मुलींची लढाई आहे, ज्यामध्ये आम्हाला न्याय मिळावा यासाठी तुम्हा सर्वांना साथ द्यावी लागेल. आम्हाला न्याय मिळावा यासाठी जंतरमंतर ते इंडिया गेटपर्यंतच्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला तरी न्याय मिळण्याची आशा दिसत नाही.
हेही वाचा : 1. PM Modi In Australia : पंतप्रधान मोदींचा सिडनीमध्ये गार्ड ऑफ ऑनरने सत्कार