हैदराबाद : 'जागतिक दूरचित्रवाणी दिन' दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. जगभर क्रांती घडवून आणणारा हा शोध आहे. टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक क्षेत्राशी संबंधित बातम्या जाणून घेऊ शकता. यामध्ये मनोरंजन, शिक्षण आणि राजकारण इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे. म्हणूनच टेलिव्हिजन दिनाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो. हे माहितीचं माध्यम आहे ज्यानं समाजात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळं जगात घडणाऱ्या गोष्टींची जाणीव आपल्याला राहते. टेलिव्हिजनचा इतिहास काय आहे आणि भारतात त्याची सुरुवात कशी झाली ते जाणून घेऊ या.
'जागतिक दूरचित्रवाणी दिन'चा इतिहास : नोव्हेंबर 1996 मध्ये, संयुक्त राष्ट्र संघानं पहिला 'जागतिक दूरचित्रवाणी मंच' आयोजित केला. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरही यात सहभागी झाले होते. इथे दूरचित्रवाणीच्या वाढत्या महत्त्वावर चर्चा झाली. यावेळी संयुक्त राष्ट्रांनी २१ नोव्हेंबर रोजी 'जागतिक दूरचित्रवाणी दिन' साजरा करण्याची घोषणा केली होती.
दूरचित्रवाणीचा इतिहास : दूरचित्रवाणीचा शोध स्कॉटिश अभियंता जॉन लोगी बेयर्ड यांनी लावला होता. त्यावेळी त्यांचं वय अवघं २१ वर्षे होतं. त्यांनी हा शोध 1924 साली लावला. यानंतर, 1927 मध्ये, फर्न्सवर्थनं पहिला कार्यरत टेलिव्हिजन तयार केला. हे मॉडेल 01 सप्टेंबर 1928 रोजी पत्रकारांसमोर सादर करण्यात आलं. 1928 मध्ये जॉन लोगी बेयर्ड यांनी रंगीत टेलिव्हिजनचा शोध लावला. सार्वजनिक प्रक्षेपण 1940 मध्ये सुरू झालं.
भारतातील टीव्हीचा इतिहास : भारतातल्या घरांमध्ये मात्र टेलिव्हिजन येण्यासाठी 3 दशकं वाट पाहावी लागली. UNESCO च्या मदतीनं 15 सप्टेंबर 1959 रोजी नवी दिल्ली इथे टेलिव्हिजनची सुरुवात झाली. 'ऑल इंडिया रेडिओ' अंतर्गत टीव्ही सुरू झाला. 'आकाशवाणी भवना'त टीव्हीचं पहिलं सभागृह बांधण्यात आलं. त्याचं उद्घाटन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झालं. भारतात टेलिव्हिजनचं पहिलं रंगीत प्रसारण १५ ऑगस्ट १९८२ रोजी इंदिरा गांधींच्या भाषणानं झालं. यानंतर ऐंशीच्या दशकात बुनियाद, हमलोग, ये जो है जिन्दगी, नुक्कड सह रामायण, महाभारत या प्रेक्षकप्रिय मालिका सुरु झाल्या.
टीव्हीचं महत्त्व : ओटीटी प्लॅटफॉर्म असूनही लोकांचं टीव्हीवरील प्रेम आजही कमी झालेलं नाही. दैनंदिन जीवनात टीव्हीचं खूप महत्त्व आहे. हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर त्याद्वारे तुम्ही जगभरातील बातम्याही जाणून घेऊ शकता. एकेकाळी बातम्या एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचायला महिने लागायचे, तर टीव्हीच्या माध्यमातून काही मिनिटांतच बातम्या लोकांपर्यंत पोहोचतात. आजच्या डिजिटल क्रांतीतही टीव्ही आपलं अस्तित्व टिकवून आहे, हे महत्त्वाचं.
हेही वाचा :