मुंबई - पुढील वर्षी भारतात होणाऱ्या महिला फुटबॉल अशिया कप २०२२ स्पर्धेचे सामने मुंबई आणि पुण्यात खेळवले जाणार आहेत. आशियाई फुटबॉल संघटनेने हा निर्णय घेतला. कोरोना प्रादुर्भावात जास्तीचा प्रवास टाळण्यासाठी महासंघाने भुवनेश्वर आणि अहमदाबादमध्ये सामने न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
अंधेरीच्या मुंबई फुटबॉल ग्राउंड आणि पुण्याच्या बालेवाडीमधील शिवछत्रपती क्रीडा संकूलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. एएफसीने याविषयी सांगितलं की, कोरोना महामारीतील आव्हाने पाहता मुंबई आणि पुण्यात सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्पर्धेत सहभागी संघ आणि अधिकारी यांना जास्त प्रवास करावा लागू नये, हा आमचा प्रयत्न आहे. सर्वजण बायो बबल वातावरणामध्ये सुरक्षित राहावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये देखील सामने खेळवली जातील. मुंबई, पुण्यातील स्टेडियममध्ये एएफसी महिला आशियाई २०२२ स्पर्धेचे सामने होतील. ही स्पर्धा २० जानेवारी २०२१ ते ६ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान, खेळवली जाणार आहे, असेही एएफसीने सांगितलं.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आणि स्थानिक आयोजन समितीचे चेअरमन प्रफुल्ल पटेल यांनी याविषयावर सांगितलं की, परिस्थितीनूसार आपल्याला मार्ग काढावा लागेल. बायो बबलची आवश्यकता आहे. यामुळे आम्ही मुंबई, नवी मुंबई आणि पुणे ही जवळपासची ठिकाणे निवडली आहेत. पटेल यांनी ओडिशा आणि गुजराज सरकारचे आभार मानले आहेत. कारण सुरूवातीला या स्पर्धेचे आयोजन ओडिशा आणि गुजरात राज्यात करण्यात येणार होते.
हेही वाचा - Big Braking! पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी इंग्लंड ताफ्यातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण
हेही वाचा - Copa America २०२१ : लुकास पॅकिएस्टाच्या गोल; ब्राझील पेरूला नमवत फायनलमध्ये