नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह मंगळवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. गुरुवारी नियमित जामिनावर सुनावणी होणार आहे. ब्रिजभूषण सिंह यांना अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट (ACMM) हरजीत सिंग जसपाल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर : भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह आणि कुस्ती संघटनेचे माजी सचिव विनोद तोमर यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने समन्स बजावले आहे. त्यांना 18 जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी दुपारी ते न्यायालयात हजर झाले. विशेष सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीसीच्या कलम ३५४, ३५४डी, ३४५ए आणि ५०६(१) अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारीच्या आधारे ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन एफआयआर नोंदवण्यात आले होते. एकाची पोक्सो कायद्यांतर्गत नोंद करण्यात आली आहे. तर आणखी कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून दुसरी एफआयआर नोंदवण्यात आली.
15 जून रोजी आरोपपत्र दाखल केले : सहा महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 15 जून रोजी आरोपपत्र दाखल केले होते. 22 जून रोजी यावर सुनावणी होऊन राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने हे प्रकरण एमपीएमएलए कोर्टाकडे वर्ग केले. 7 जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपपत्राची गंभीर दखल घेत ब्रिजभूषण आणि तोमर यांना समन्स बजावत न्यायालयात हजर केले होते.
काय आहे प्रकरण : जानेवारी 2023 मध्ये काही महिला कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने एक अंतर्गत समिती स्थापन करून प्रकरण चौकशी समितीकडे सोपवले होते. मार्चमध्ये अंतर्गत समितीचा अहवाल आला. मात्र महिला कुस्तीपटूंनी समितीवर पक्षपाताचा आरोप केला होता. 28 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आयपीसीसह पॉक्सो अंतर्गत एफआयआर नोंदवला.
हेही वाचा :