चेन्नई : दाक्षिणात्य लोक चित्रपट आणि राजकारण अतिशय गांभीर्याने घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये द्रमुकचा विजय झालेला पाहून, राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील एका महिलेने मात्र आपली जीभ कापली आहे. परामकुडी गावातील एका मंदिरात ती बेशुद्धावस्थेत आढळून आली.
द्रमुकच्या विजयासाठी केला होता नवस..
तामिळनाडूमध्ये द्रमुक तब्बल दहा वर्षांनी पुन्हा सत्तेत आलं आहे. या विधानसभा निवडणुकांमध्ये द्रमुकचाच विजय व्हावा, यासाठी कित्येकांनी देव पाण्यात ठेवले होते. ३२ वर्षांच्या वनीतानेही मुथलाअम्मन देवीला यासाठी नवस केला होता. द्रमुकचा विजय झाल्यास आपण आपल्या जिभेची आहुती देवीला देऊ असा नवस तिने केला होता.
द्रमुकच्या विजयाची बातमी मिळताच वनीताने थेट मुथलाअम्मन देवीचे मंदिर गाठले. तिला खरंतर आत जाऊन देवीच्या समोर आपली जीभ कापायची होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांमुळे तिला मंदिरात प्रवेश करता आला नाही. त्यामुळे तिने मंदिराच्या दारातच आपली जीभ कापून टाकली, आणि रक्तस्त्रावामुळे ती तिथेच बेशुद्ध पडली.
प्रकृती स्थिर; बोलताही येईल..
याबाबत माहिती मिळताच तिच्या पतीने तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सांगितले, की तिने सुमारे एक सेंटिमीटर जीभ कापली होती. तिच्या जिभेचा तुकडा शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मिळाला नाही. त्यामुळे तिच्या जिभेला टाके घालण्यात आले आहेत. तिची प्रकृती सध्या स्थिर असून, तिला बोलायला जास्त अडचण येणार नसल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : मध्य प्रदेश : 'कुंभ'मधून परतलेल्यांपैकी ९९ टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह!