नवी दिल्ली : केंद्र सरकारने जर नागरिकांना मोफत कोरोना लस दिली नाही, तर दिल्ली सरकार ते काम करेल अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली. नागरिकांना ही लस मोफत देण्यात यावी अशी यापूर्वीच आम्ही केंद्र सरकारला विनंती केल्याचेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील नागरिकांना मोफत लस..
देशातील कित्येक नागरिकांना लसीची किंमत परवडणारी नाही. त्यामुळे केंद्राने देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस द्यावी अशी विनंती आम्ही केली आहे. त्यावर केंद्र सरकार काय निर्णय घेते हे आम्ही पाहू. जर, केंद्र सरकारने मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय नाही घेतला, तर दिल्लीतील नागरिकांसाठी आम्ही ही लस मोफत देऊ, असे केजरीवाल यांनी सांगितले.
लसीच्या विश्वासार्हतेवर शंका नको..
आपल्या संशोधकांनी अविरत मेहनत करुन ही लस तयार केली आहे, तसेच केंद्रानेही आवश्यक त्या चाचण्या पार पाडल्यानंतरच त्याला मंजूरी दिली आहे. त्यामुळे, या लसीवर कोणीही शंका न घेता, लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केले.
दिल्लीमध्ये शनिवारपासून ८९ केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे. सर्वप्रथम आरोग्य आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. तसेच, दिल्लीमधील दहावी आणि बारावीचे वर्गही १६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत.
हेही वाचा : देशातील ११ शहरांमध्ये पोहोचली कोव्हॅक्सिन लस; भारत बायोटेकची माहिती