तिरुवन्नमलाई : काश्मीरमध्ये तैनात असलेल्या एका लष्करी जवानाच्या पत्नीला अर्धनग्न करुन तब्बल 120 नराधमांनी मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लष्करातील जवानाने व्हिडिओ शेअर करुन या घटनेची माहिती दिली आहे. तामिळनाडूतील नागापट्टिनम जिल्ह्यातील कडवसरा गावात आपल्या पत्नीला अर्धनग्न अवस्थेत बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस त्यागराजन यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
120 जणांनी केली मारहाण : या व्हिडीओमध्ये हवालदार प्रभाकरन दिसत आहे. तो तामिळनाडूमधील पडवेडू गावातील आहे. यात जवानाने म्हटले आहे की, माझी पत्नी भाडेतत्त्वावर दुकान चालवते. तिला 120 जणांनी मारहाण केली आणि दुकानातील सामान बाहेर फेकले. याबाबत मी पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज पाठवला असून त्यात त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. यासोबतच जवानाने डीजीपीला या प्रकरणात मदतीची विनंतीही केली आहे. या नराधमांनी जवानाच्या कुटुंबावर चाकूने हल्ला करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये त्याने पत्नीला अर्धनग्न करून अमानुष मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
दुकान सोडण्यावरुन झाला हल्ला : या व्हिडिओबाबत सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी कांदळवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेणुगंबल मंदिराच्या जमिनीवर बांधलेले एक दुकान कुमार यांनी प्रभाकरनचे सासरे सेल्वामूर्ती यांना ९.५ लाख रुपयांना पाच वर्षांसाठी भाड्याने दिले होते. कुमारच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रामू याला दुकान परत हवे होते. म्हणून त्याने पैसे परत करण्यास सहमती दर्शविली आणि 10 फेब्रुवारी रोजी करार झाला. पण सेल्वामूर्ती यांनी पैसे स्वीकारण्यास नकार देत दुकान सोडण्यास नकार दिल्याचा दावा रामूने केला आहे. 10 जून रोजी रामू सेल्वामूर्ती यांची मुले जीवा आणि उदय यांना पैसे देण्यासाठी दुकानात गेला होता. यावेळी रामूवर कथित हल्ला झाला होता.
रामूच्या समर्थनार्थ उतरले नागरिक : दुकानाच्या वादातून झालेली हाणामारी पाहिल्यानंतर अनेक लोक रामूच्या समर्थनार्थ उतरले. त्यामुळे भांडणाने मोठे वळण घेतले, असा पोलिसांचा दावा आहे. या लोकांनी दुकानात ठेवलेला माल बाहेर फेकून दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकरनची पत्नी कीर्ती आणि त्याची आई दुकानात असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला केला नाही. त्यानंतर संध्याकाळी प्रभाकरनच्या पत्नीने स्वत:ला रुग्णालयात दाखल केले. हवालदाराने पत्नीला गंभीर दुखापत झाल्याचा दावा केला असला तरी, मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनी जवानाशी साधला संवाद : तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनी लष्कराच्या जवानाशी संवाद साधला आहे. भाजप जवानाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जवानाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप पक्ष त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तिरुवन्नमलाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कार्तिकेयन यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण देत व्हिडिओ जारी केला आहे.